
एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची घोषणा हे वर्षभर पाईप लिक होऊन फुकट घालवलेल्या पाणी व्यवस्थापनाच्या बेदरकार कारभाराचे फलित- अॅड. दीपक पटवर्धन
आज एक दिवसा आड पाणीपुरवठा होण्याची घोषणा झाली याचा अर्थ रत्नागिरी शहरात जनतेला आता पाण्यासाठी
त्राहीमाम व्हावे लागणार. कोट्यवधी रुपये खर्चून गाजत असलेली पाणी योजना पाच वर्षातही परिपूर्ण न करण्याचा अगर पाच वर्ष योजना अपूर्ण ठेवण्याचा विक्रम या शहराने अनुभवला. आणि हे विक्रमी काम सुरु असताना रस्तोरस्ती पाण्याचे पाट आणि कारंजी नगरजननी पहिली. हे फुकट जाणारे पाणी वाया गेलं आणि वर्षभरात अशा बेपर्वाईमुळे किती हजार लिटर पाणी फुकट गेलं याचा हिशोब कोण करणार? अनागोंदी कारभारामुळे फुकट गेलेल्या पाण्याची शिक्षा म्हणून आता होणार एक दिवसाआड पाणी पुरवठा.. मात्र ही शिक्षा नगरजनांना का? त्यांचा दोष काय? मात्र मुकी जनता भरडली जाते. ही पूर्वापार सुरु असलेली प्रथा म्हणून पाणी कापतीची, पाणी टंचाई ची झळ जनतेने सोसायची.
रस्तोरस्ती हजारो लिटर पाणी फुकट जात होते. मात्र तत्कालीन जबाबदार लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष करून नव्या पाणी योजनेच्या कैफात संबंधित गर्क होते त्यांना फुकट जाणाऱ्या पाण्याची किमत नव्हती. मात्र आज याच फुकट गेलेल्या पाण्याची किमत पाणी टंचाईचा सामना करत जनतेला सोसावी लागत आहे. ही पाणी टंचाईची वेळ बेदरकार, बेजबाबदार वर्तनाचे फलित आहे अशी खरमरीत बोचरी प्रतिक्रिया भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.