धामापूर-संगमेश्वर येथील चव्हाण कुटुंबावर काळाचा घाला! खेडमधील अपघातात एक ठार, सात जखमी
खेड : संगमेश्वर तालुक्यातील धामापूरहून मुंबईकडे जाणार्या कारला खेडमध्ये अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकली.
या अपघातात एक जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी रेल्वे पुलाजवळ हा अपघात झाला.
मंगळवारी दि. 17 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
दि. 17 रोजी किशोर वसंत चव्हाण (वय 48, रा. धामापूर, ता. संगमेश्वर) हा क्वालिस कार (एम.एच.04, बि.एन.4193) घेऊन धामापूर-संगमेश्वर ते मुंबई जात होता. खेड तालुक्यातील खवटी येथे पहाटे 3 वाजता किशोर याचा कारवरील ताबा सुटून कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असणार्या आयशर टेम्पो (एम.एच.08 ए.पी.6996) ला मागून धडक दिली. कारचालक किशोर याला गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी नेण्यात आले असताना डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. कारमधून प्रवास करणारे सनम संदीप चव्हाण (वय 12), हर्षदा किशोर चव्हाण (वय 40), संतोष आबाजी चव्हाण (वय 55), रितिका केशव चव्हाण (वय 16), सार्थक किशोर चव्हाण (वय 14), स्मिता संतोष चव्हाण (वय 50), स्नेहा सुरज कर्वे (वय 28) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचार सुरू आहेत.