कृषी उन्नतीसाठी ‘रत्न कृषी महोत्सव’
शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकर्याला त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवून द्यायचे असेल तर त्याच्या उत्पादनाला योग्य अशा वितरण व्यवस्थेची जोड देणे आवश्यक ठरते. त्यातही थेट ग्राहकांपर्यंत शेतकरी पोहोचला तर ते दोघांच्याही फायद्याचे ठरते. याच भूमिकेतून रत्नागिरीत 19 ते 21 मे या कालावधीत रत्न कृषी महोत्सव आणि पशूपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हापूस आंबा ही रत्नागिरीची ओळख आहे मात्र येथे उत्पादित हापूस अधिक प्रमाणात बाहेरील बाजारपेठेत विकला जातो. स्थानिक ग्राहक आणि आंबा उत्पादक यांची सांगड या कृषी महोत्सवानिमित्त घातली जाईल. आंबा विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठी स्वतंत्र दालन या महोत्सवात राहणार आहे. आंबा हंगाम संपल्यानंतर यावर प्रक्रिया उद्योग करण्याची संधी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आहे. यात असणारी संधी आणि प्रक्रिया उद्योगाची क्षमता यांची वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून या कृषी महोत्सवाला विशेष महत्व आहे.
सध्याचा काळ पारंपरिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देण्याचा काळ आहे. जिल्ह्यात मुख्यत्वे भाताचे व त्या खालोखाल नागलीचे पीक घेतले जाते. भात पिकाच्या शेतीत रोपे तयार करणे आणि योग्य वेळी त्याची लावणी करणे आवश्यक आहे. या दोन्हीबाबत योग्य वेळ साधता आली तर भाताची एकरी उत्पादकता वाढणार आहे. हंगामाच्या कालावधीत या सर्व कामात यंत्रांचा वापर झाला तर मोठ्या प्रमाणावर वेळ व श्रम यांची बचत तर होईलच सोबत उत्पादकता वाढल्याने शेतकरी देखील संपन्न होईल. भात शेतीसाठी वापरण्यात येणारी विविध यंत्रे तसेच बियाणे आणि भात लागवडीच्या नव्या पध्दती याची ओळख शेतकर्यांना या महोत्सवात होईल. शेतीसाठी अनेक वेळा आवश्यकतेपेक्षा अधिक खत वापरले जाते. खताची निवड आणि त्याचा वापर याबाबतही येथे माहिती मिळणार आहे.
नुसत्या एक हंगामी शेतीवर अवलंबून न राहता शेतकर्यांनी दुधाळ जनावरे पाळणे तसेच कुक्कुट पालन आदी जोड व्यवसाय केला तर त्यांचे उत्पन्न वाढणार आहे. याच भूमिकेतून या महोत्सवात पशू-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शेळीपालनापासून दूध उत्पादनापर्यंत अनेक पर्याय आणि पशू पक्षांच्या विविध जाती प्रजाती आपणास प्रदर्शनात बघता येतील, त्याची माहिती घेता येईल. शेतकर्यांना विनासायास हक्काचा वित्त पुरवठा किसान क्रेडीट कार्ड द्वारे मिळतो. पात्र शेतकरी कोणते व यासाठी कोणती कागदपत्रे लागणार याचीही माहिती शेतकर्यांना याठिकाणी मिळेल. शहरातील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार्या या रत्न महोत्सवात परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना येथे बचतगटांची उत्पादने तसेच खास कोकणी खाद्य पदार्थांची चव चाखता येणार आहे. कृषी उन्नतीसाठी होणारा हा रत्न कृषी महोत्सव, सर्वांनी भेट द्यावी असाच महोत्सव राहणार आहे.
– प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी-रत्नागिरी