पुण्यातील पर्यटकांवर रॉड, कोयतीने वार करणाऱ्या दापोलीतील तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पोलिस कोठडीत रवानगी
दापोली : पुण्यातील पर्यटकांवर लोखंडी रॉड व कोयत्याने वार करणाऱ्या दापोलीतील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दापोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रविवार दि. 15 मे रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. भारत मुळे, अंकुर माने, सोनल आंबीए (सर्व दापोली तालुक्यातील रहिवासी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. शुभम परदेशी (वय 29, रा. थेरगाव गणेश नगर-पुणे) याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
परदेशी हा पुण्यावरून मित्र नितीन अडसूळ, सुरज काळे, सुमित गुजर यांच्यासोबत पर्यटनाला आला होता. त्यांची कार हॉटेल सुराली गार्डन या ठिकाणी आली असता तेथे रस्त्यावर उभी असलेली क्रेटा कार (एम. एच.11, सी. क्यू. 4040) बाजूला घेण्यास परदेशी याने सांगितले. याचा राग येऊन तीन ते चार जणांनी परदेशी याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
भांडण व्हायला नको म्हणून शुभम परदेशी गाडी घेऊन तेथून निघून गेला. त्यानंतर भारत मुळे व त्याचे सहकारी यांनी गाडीचा पाठलाग केला. हर्णै येथे हॉटेल समुद्र संकेत येथे परदेशी यांनी कार थांबविली असता पाठीमागून दोन गाड्यांमधून आलेल्या संशयित आरोपींनी पार्क केलेल्या कारच्या मागे आपली के्रटा कार लावली. यानंतर भारत मुळे याने लोखंडी रॉडच्या सहाय्याने परदेशी याच्या कारच्या काचा फोडल्या. एकाने भारत मुळेला कोयती आणून दिली. त्यानंतर कोयतीच्या सहाय्याने भारत मुळेने कारवर तसेच कारमधील अन्य व्यक्तींवर वार करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत असणार्या महिलेने गाडीच्या काचेवर दगड मारून काच फोडली. या घटनेत फिर्यादी शुभम परदेशी गंभीर जखमी झाला. परदेशीच्या कारमध्ये असलेल्या बलवंत कांबळे, सुरज काळे, नितीन अडसूळ, सुमित गुजर यांना देखील मारहाण करण्यात आली.
जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी भारत मुळे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.