
जे.जे.हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरून खाडीत उडी
नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जे.जे.हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका 32 वर्षीय डॉक्टराने अटल सेतूवरून खाडीत उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री 9 वाजून 43 मिनिटांनी घडली. डॉ.ओंकार भागवत कवितके (वय-32, व्यवसाय- डॉक्टर, जे. जे. हॉस्पिटल) असे या डॉक्टरांचे नाव आहे. ते कळंबोली येथील अविनाश सोसायटीमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे.एका व्यक्तीने अटल सेतूवरून खाडीत उडी मारल्याची माहिती मिळताच, अटल सेतू नियंत्रण कक्षाला तात्काळ कळवण्यात आले. माहिती मिळताच, पोलिस आणि बीट मार्शलचे पथक युद्धपातळीवर घटनास्थळी दाखल झाले. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील 11.800 किलोमीटर बिंदूवर, जिथे ही घटना घडली, तिथे त्यांना डॉ. कवितके यांची होंडा अमेझ कार (MH 46 CM 6837) आणि त्यांचा एक आयफोन आढळून आला.
मोबाईलमध्ये असलेल्या संपर्कांद्वारे पोलिसांनी तात्काळ डॉ. कवितके यांची ओळख पटवली.




