रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
टीडब्ल्यूजे इव्हेंट्स आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि . 20 ते 22 मे दरम्यान ‘द टॉकींग फ्रेम्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रत्नागिरी येथील सिटीप्राईड चित्रपटगृह व गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच असा महोत्सव होत असल्याची माहिती डॉ. संतोष पाठारे व प्रसन्न करंदिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टीडब्ल्यूजे द सोशल रिफॉर्म्स ही संस्था चिपळूण, देवरुख, सातारा व पुणे येथे विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमिताने रत्नागिरी येथे या संस्थेचे कार्य सुरु करीत आहे. या महोत्सवा निमित्ताने गिल्टी (डॅनीश), ला मिझरेबल (फ्रेंच), यंग अहमद (फ्रेंच) या कान आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिक विजेते चित्रपट तसेच निवास (मराठी), आदाल (मल्याळम), सुमित्रा भावे एक समांतर प्रवास (मराठी माहितीपट) हे चित्रपटही पाहता येणार आहेत. महोत्सवाची नोंदणी सिटीप्राईड, रत्नागिरी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे दि . 15 मे पासून सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू रहाणार आहे.
महोत्सवाचा समारोप प्रकाश कुंटे दिग्दर्शित शक्तीमान या अप्रदर्शित चित्रपटाने होणार आहे. या महोत्सवाच्या निमिताने लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील निवडक 20 लघुपटांचे परीक्षण राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि प्रकाश कुंटे करणार आहेत. समारोपावेळी सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रकार, संगीत, ध्वनीमुद्रक, संकलक यांना गौरवण्यात येणार आहे. या महोत्सवात ‘कला आरंभ’ या चित्रकारांच्या चमूतर्फे चित्रपटविषयक चित्रप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या महोत्सवात सुनील सुकथनकर, अनिरुद्ध सिंग, प्रकाश कुंटे, शरीफ ईसा उपास्थित राहणार आहेत.