
देवरूख डेपोचा तिकिटांचा सर्व्हर डाऊन; फेऱ्यांचे नियोजन कोलमडले, प्रवासी संतप्त
देवरूख : मागील दोन ते तीन दिवसांपासून देवरूख डेपोच्या बस फेऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे अनेक फेऱ्या रद्द करून बहुतांश फेऱ्या उशिराने सोडल्या जात असून प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. एसटी बस उपलब्ध आहेत, प्रवासी आहेत, कर्मचारी उपलब्ध असूनदेखील तिकिटांचा सर्व्हर डाऊन असल्याने सर्व कारभार कोलमडला आहे.
ऑटोमॅटिक तिकीट मशीन सध्या सगळीकडेच वापरल्या जात आहेत. या मशिनची यंत्रणा मुंबईतून ऑनलाइन कार्यरत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतून सर्व्हर डाऊन असल्याने ऑटोमॅटिक मशीन सध्या वापरात नाहीत. त्यामुळे जुनी कागदी तिकिटे वापरण्याची वेळ वाहकांवर आली आहे. नवीन वाहकांना या जुन्या तिकिटांची सवय नसल्याने हिशोब लावण्यात बराच वेळ लागत आहे. तिकिटांचा हिशोब आगारात देताना नाकीनऊ येत आहे. त्याचा परिणाम फेऱ्या उशिरा सोडण्यावर होत आहे. एका फेरीचा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सोडली जात नाही. त्यामुळे फेऱ्यांना उशीर होतो. ऑटोमॅटिक मशीन वापरण्याची सवय असल्याने आता तिकीट फाडून त्याचा लेखी हिशोब देणे वाहकांना डोकेदुखी ठरली आहे. तिकीट मशीनची कमतरता देखील डेपोत आहे. काही वाहक अंदाजाने तिकीट फाडून देत असल्याने प्रवाशांसोबत बाचाबाची होत आहे. ऑटोमॅटिक मशिनने वाहकांचे काम जलद होत होते. आता मात्र वेळ जास्त लागत असल्याने फेऱ्यांचे नियोजन करताना ही यंत्रणा हैराण झाली आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी आले आहेत. त्यामुळे एसटीला गर्दी आहे. पावसाळ्यापूर्वीचे विविध साहित्य घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक देवरूखमध्ये खरेदीसाठी येत आहेत. मात्र फेऱ्या वेळेवर सुटत नसल्याने तसेच काही फेऱ्या आयत्यावेळी रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. हा सर्व्हर कधी सुरू होणार? आणि कंडक्टरच्या हाती कधी स्वयंचलित ऑनलाइन तिकीट मशीन येणार याकडे लक्ष लागले आहे. सध्या प्रवासी उपलब्ध असताना काही कर्मचारी मात्र गाड्या डेपोत उभ्या करून बसून आहेत. मुंबईतून चालणाऱ्या या यंत्रणेचा बिघाड दूर करण्यासाठी देवरूख डेपोत काही तज्ञ आले होते. त्यांनी शनिवारी यंत्रणा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
