दापोलीत पेट्रोल पंप चालक, कामगारांची अरेरावी
दापोली : दापोलीत चार दिवस पेट्रोलचा तुटवडा भासत आहे. मात्र, काही पेट्रोल पंपावर येथील व्यवस्थापक आणि कर्मचारी यांची अरेरावी वाढलेली दिसत आहे. पेेट्रोल बॉटलमध्ये देण्यास प्राधान्य दिले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. “पेट्रोल आधी गाडीत द्या, नंतर बॉटलमध्ये द्या” असे येथील नागरिक पंप व्यवस्थापकांना सांगत असताना “पेट्रोल हवं असेल तर घ्या, अन्यथा गेलात तरी चालेल” अशी अरेरावी करत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. दापोलीत पेट्रोल तुटवडा असल्याने नागरिक पेट्रोल पंपावर रात्री रांगा लावत आहेत. महिला देखील रात्री पंपावर रांगेत असतात. अशावेळी काही पंप कर्मचारी आणि येथील व्यवस्थापक नागरिकांच्या वाहनांत पेट्रोल टाकण्याऐवजी बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास आधी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. पेट्रोल पंपावर तक्रार करण्यासाठी आणि ती लेखी स्वरूपात मांडण्यासाठी तक्रारवही असते. मात्र अशा वेळेस नागरिकांना तक्रार वही तक्रार लिहिण्यासाठी दिली जात नाही. त्यामुळे तक्रार नेमकी करायची कुणाकडे? असा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे