
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 दिवसांच्या गणरायाला निरोप
सिंधुदुर्ग : फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!! च्या वातावरणात तळकोकणात 11 दिवसांच्या गणपती बाप्पांचे शनिवारी विसर्जन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 दिवसांनी गणरायाचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार यंदाही तळकोकणात ही परंपरा जपण्यात आली. प्रमुख नद्यांमध्ये, गणेश घाटांवर, समुद्राच्या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. यंदा कोणतेही शासकीय नियम नसल्याने भक्तांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा केला. कोरोनामुळे दोन वर्ष गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले होते. यावर्षी कोरोना मुक्तीनंतर गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावेळी भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. चाकरमानी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. दुपारी तीन वाजल्यापासूनच ग्रामीण व शहरी भागात बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली. यावर्षी पाऊसही विसर्जनाला होता. मोठमोठ्या मिरवणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळाल्या.