दापोलीत चार लाख रूपये खर्चून घरकुल डेमो इमारत

दापोली : पंचायत समिती आवारात सुमारे चार लाख इतका खर्च करून स्लॅबची घरकुल डेमो इमारत उभारण्यात आली आहे. या  इमारत बांधकामातून दापोली पंचायत समितीने नेमके काय साधले? असा सवाल आता दापोली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. 27 रोजी येणारी पंचायत राज समिती या कामाची पाहणी करणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. घरकुल लाभार्थ्यांनी कमी खर्चात आणि शासनाकडून मिळणार्‍या रकमेतून घरकुल कसे बांधावे, हे दाखविणारा घरकुल डेमो घरकुल लाभार्थ्यांना अपेक्षित होता. मात्र बांधण्यात आलेली चार लाखांची घरकुल डेमो इमारत पंचायत समितीत येणार्‍या नागरिकांचा अपेक्षाभंग करत आहे. घरकुल इमारत बांधण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाकडून 1 लाख 20 हजार इतके अनुदान मिळते.  काही रक्कम ही मस्टर स्वरूपात मजुरांच्या नावे बँक खात्यात जमा होते. मात्र ही  मस्टर मजुरी रक्कम अनेकवेळा लाभार्थ्यांना मिळतही नाही. मिळाली तर ती थोडीफार मिळते. अशा अनेक तक्रारी पंचायत समिती दप्तरी
आहेत. 1 लाख 20 हजार इतक्याच रकमेत लाभार्थीला घर बांधावे लागते. घरावर सिमेंट पत्रा, खिडक्या आणि दरवाजे असा लाभार्थ्यांच्या घरकुलाचा थाट असतो. मात्र दापोली पंचायत समितीने थाटमाट करून बांधलेली घरकुल इमारत अनेक लाभार्थ्यांची निराशा करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button