
टंचाईग्रस्त गावांची तहान भागविणारी चोरद नदी दूषित टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांमधून संताप
——————————–
खेड : खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविणाऱ्या खेड आंबवली मार्गावरील चोरद नदीपात्रात जनावरे, वाहने आणि कपडे धुतले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. हेच दूषित पाणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना टँकरद्वारे पुरविले जात असल्याने टंचाईग्रस्त ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. ज्या डोहातून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जातो त्या डोहात जनावरे, वाहने आणि कपडे धुणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई कारवाई अशी मागणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.
खेड तालुका हा टंचाईच्या यादीत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर असलेला तालुका, फेब्रुवारी महिन्यापासूनच या तालुक्यातील काही गाव आणि वाडयांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. डोंगरमाथ्यावर वसलेल्या धनगरवाडयांमध्ये सुरु होणारी पाणी टंचाई हळू हळू अर्धाधिक तालुका व्यापून टाकते. हंडाभर पाण्यासाठी टंचाईग्रस्त ग्रामस्थांना विशेष करून महिला वर्गाला तासतासांची पायपीट करावी लागते. इतके करूनही पाणी मिळेलच ही खात्री नसल्याने टंचाईच्या काळात महिलांची अवस्था अतिशय केविलवाणी होती.
टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या घशाला पडलेले कोरड शमविण्यातसाठी पंचायत समिती स्तरावर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. ग्रामस्थांच्या मागणीनुसार नियोजन करून टंचाईग्रस्त गावांकडे टँकर धावू लागतो. खेड आंबवली मार्गावरील चोरद नदीच्या डोहातील पाणी हे पाणी टंचाई ग्रामस्थांसाठी राखीव ठेवलेले असते. फेब्रुवारी महिन्ह्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस पडेपर्यंत चोरद नदीच्या डोडोहातील पाणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना पुरविले जाते.गेली अनेक वर्ष हे सुरूच आहे. तालुका टँकरमुक्त व्हावा असे सर्वसामान्य जनतेला वाटते आहे मात्र प्रशासन चालविण्याऱ्या लोकप्रतिनिधींना तसे काहीच वाटत नसल्याने वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
सद्य स्थितीत खंड तालुक्यातील १२ गावे आणि या गावातील वाड्या पाणी टंचाईच्या वणव्यात होरपळत आहेत हंडाभर पाण्यासाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे. काही गावांमध्ये तर महिलाना रात्रभर पाणवठयावर बसून हंडाभर पाणी मिळवावा लागत आहे. ग्रामस्थांना यातून दिलासा मिळावं यासाठी प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र हे पाणी ज्या नदीपात्रातून भरले जाते ते चोरदनदीचे पात्रच दूषित केले जात असल्याने टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरणायची शक्यता नाकारत येत नसल्याने ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे नदीपात्र दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.