चिपळुणात 15 रोजी हिंदू एकता दिंडीचे आयोजन
चिपळूण : हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून रविवार दि. 15 मे रोजी हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात हिंदूत्ववादी संघटनांची नुकतीच नियोजन बैठक झाली. हिंदुत्ववादी सामाजिक संघटनेने एकता दिंडीच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये 15 मे रोजी दुपारी 3:30 ते सायंकाळी 6:30 या वेळेत चिपळूण शहरात हिंदू एकसंघ शक्तीच्या आविष्कारासाठी एकता दिंडीचे आयोजन करण्याचा निर्णय झाला आहे. दिंडीची सुरुवात विरेश्वर मंदिर येथून होणार असून बाजारपेठ मार्गे वेस मारूती मंदिर येथे दिंडीची सांगता होणार आहे. एकता दिंडीमध्ये शौर्य जागृती प्रात्यक्षिके, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीपर चित्ररथ, भजन, दिंड्या, ढोल-ताशा पथकाचा सहभाग असणार आहे. या दिंडीमध्ये हिंदुत्ववादी संघटना, विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन कालभैरव सांस्कृतिक मंचाचे विश्वास चितळे, पराग ओक, वारकरी सांप्रदायाचे शितप, चिले, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, आशिष खातू, कुंभार समाजाचे गुढेकर, शिव प्रतिष्ठानचे परब, राजस्थानी विष्णू समाजाचे राजभर आदींनी केले आहे.