राजापुरात ४२ मशिदींवर भोंग्यासाठी पोलिसांची परवानगी
राजापूर : तालुक्यातील राजापूर व नाटे पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 42 मशिदींनी भोंग्याबाबत पोलिस प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली आहे. मात्र, ही परवानगी देताना पोलिसांनी नियम आणि अटी शर्ती घालून दिल्या असून न्यायालयाच्या आदेशान्वये रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत ध्वनीक्षेकाचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसात धार्मिक स्थळांवरील भोग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र या वातावरणातही राजापूरकरांनी आपली शांततेची आणि संयमाची परंपरा कायम जपली आहे. राजापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 31 मशिदींच्या प्रमुखांनी ध्वनीक्षेपकांची परवानगी घेतली आहे. तर नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 11 मशिदी असून त्यांनीही ध्वनीक्षेपकांसाठी परवानगी घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या अटी शर्तींमध्ये परवान्यातील ध्वनिक्षेपकाचा वापर कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळासमोर करताना धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारच्या घोषणा वा नारे देऊ नयेत अगर आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत. ध्वनी प्रदूषण, विनियमन व नियंत्रण पालन न केल्यास ध्वनीप्रदूषण विनियमन व नियंत्रण अधिनियम, 2000 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. अर्जामध्ये नमूद केलेली ध्वनीक्षेपकाची जागा पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय बदलता येणार नाही. ध्वनी प्रदूषण विनियमन व नियंत्रण अधिनियम, 2000 चे कलम 8 अन्वये दिलेल्या निदेर्शाचे उल्लंघन केल्यास ध्वनीक्षेपक/लाऊडस्पिकर वापराकरिता दिलेला परवाना रद्द केला जाईल. दिलेला परवाना रद्द करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार रहाणार आहे.