बहिणीला चिपळूण रेल्वेस्टेशनवर आणायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू
चिपळूण : गुहागर तालुक्यातील दुचाकीस्वाराचा आयशर गाडीने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. महेश प्रभाकर गुरव (वय-43) असे मृत प्रौढाचे नाव आहे. चिपळूण बाजारपेठेतील नाथ पै चौक येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. मृत महेश हा वेळंब येथील रहिवासी आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महेश हा पहाटेच्या सुमारास गुहागरवरून चिपळूण रेल्वे स्थानकात आपल्या बहिणीला आणण्यासाठी निघाला होता. तो चिपळूण बाजारपेठेत येताच बॅ. नाथ पै चौकात त्याला एका आयशर गाडीची जोरदार धडक बसली. त्यामध्ये महेश हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संबंधित आयशर चालक गाडीसह तेथून पसार झाला. यावेळी काहींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो हाती लागला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संबंधित गाडीचा शोध पोलिस घेत आहे.