
कुशल कामगार घडवण्यासाठी छोटे-छोटे कोर्स सुरू करा; उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या सूचना
रत्नागिरी : आगामी काळात येणार्या व सध्या अस्तित्वात असणार्या कंपन्यांना नोकरीसाठी कुशल कामगार वर्ग आवश्यक असतो.त्यानुसार कामगार उपलब्ध व्हावेत, यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने कमीत कमी मुदतीचे छोटे सर्टीफिकेट कोर्स सुरू करावेत. यातून कंपन्यांना स्थानिक कामगार मिळतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी महाविद्यालयाच्या आढावा बैठकीत सूचित केले.
रस्तोगी हे रविवारी रत्नागिरी दौर्यावर होते. यावेळी त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह सहकारी प्राध्यापक आणि स्टाफची आढावा बैठक घेतली. यावेळी प्राचार्य ए. एम. जाधव यांनी महाविद्यालयाच्या 40 ते 45 वर्षे जुन्या इमारतींची माहिती दिली. त्याचबरोबर रिक्त पदे, महाविद्यालयातील विविध शाखांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती दिली.
महाविद्यालयाच्या आवारात औषधशास्त्रासह इतर काही नवीन इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या इमारतींच्या बांधकामाची गुणवत्ता आपल्याच स्थापत्य विभागाकडून तपासाव्यात, अशा सूचनाही रस्तोगी यांनी यावेळी केल्या. प्राचार्यांच्या दालनात ही आढावा बैठक झाली. यावेळी प्रधान सचिवांचे स्वागत तंत्र शिक्षण कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी केले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या नुतनीकरणाबाबत प्रस्ताव पाठवावेत, या खात्याचे मंत्री उदय सामंत आणि आपण निधीसाठी सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन दिले. महाविद्यालयाचे ऋषाल पाटकर यांनी महाविद्यालयातील काही माहिती दिली.