सावर्डेच्या ईशा पवारची वेरोनिकाच्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी
चिपळूण : सावर्डेची सुकन्या आणि सह्याद्रि शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी ईशा केतन पवार हिने वेरोनिकाचा वर्ल्ड कप 2022 वर्ल्ड रँकिंग इव्हेंटमध्ये धनुर्विद्या (आर्चरी) या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदकाची कमाई केली. ही स्पर्धा युरोपमधील स्लोव्हेनिया देशात कामनिक शहर या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये 12 देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. याआधी इशाने भारताचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. ती आता टीडब्ल्यूजे आर्चरी अकादमीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक ओंकार घाडगे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. आर्ट्स व सायन्स कॉलेज सावर्डेमध्ये B.M.S. च्या प्रथम वर्षात ईशा शिक्षण घेत आहे. लहानपणापासुन ईशा आर्चरीचे प्रशिक्षण घेत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. १०० हून अधिक पदके तिने आजपर्यंत पटकावली आहेत. तिच्या या यशाबद्दल आमदार शेखर निकम यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.