
पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी:- सिंधुरत्न कलामंच संस्थेच्या वतीने दि. 9 ते 14 मे दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 9 मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे अशी माहिती सिंधुरत्न कलामंच संस्थेचे अध्यक्ष आणि अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, विजय राणे, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे यांनी एकत्र येत सिंधुरत्न कलामंचची स्थापना केली. कोकणात प्रचंड गुणवत्ता आहे. कोकणातील काही कलाकार मुंबईपर्यंत पोहचतात. मात्र काही कलाकारांना पोहचता येत नाही अशा कलाकारांसाठी कोकण चित्रपट महोत्सव आम्ही आयोजित करत आहोत. या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील सौंदर्य सर्वदूर पोहचवत पर्यटनाला चालना देण्याचे काम केले जाणार असल्याचे अभिनेते विजय पाटकर यांनी सांगितले.
सिंधुरत्न कलामंच संस्था आणि रत्नागिरी नगर परिषद आयोजित कोकण चित्रपट महोत्सवात 9 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रवास हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 10 मे रोजी दुपारी 12 वाजता 8 दोन 75, दुपारी 3 वाजता पल्याड, सायंकाळी 6 वाजता रिवणावायली, 11 मे रोजी दुपारी 12 वाजता जीवनसंध्या, दुपारी 3 वाजता मी पण सचिन, सायंकाळी 6 वाजता प्रितम, 12 मे रोजी दुपारी 12 वाजता जनरल, दुपारी 3 वाजता भारत माझा देश आहे, सायंकाळी 6 वाजता हिरकणी हे चित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात 14 चित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहेत. वेंगुर्ला येथे 12 मे रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून 14 मे रोजी मामा वरेरकर नाट्यगृहात कोकण चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कारांची नामाकंने जाहिर करण्यात आली आहेत. यापुरस्कार सोहळ्यात कोकणातील स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.