
तिवरे धरण दुर्घटना : तिघेजण जिवंत असतानाही पुनर्वसन यादीत दाखवले मृत
चिपळूण : तालुक्यातील तिवरे येथील धरण 2 जुलै 2019 रोजी फुटले. यामध्ये 22 जणांचा बळी गेला तर 14 घरांसह गोठे वाहून गेले. यावेळी झालेल्या पंचनाम्यानुसार 42 कुटुंबांची पुनर्वसन यादी तयार करण्यात आली. यातील तीन लोक जिवंत असताना पुनर्वसन यादीत मात्र मृत दाखविण्यात आले आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ उडाली असून गेले अनेक दिवस या बाबत प्रशासनात चर्चा सुरू होती. याबाबत प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी तहसीलदार सूर्यवंशी यांना चौकशीचे आदेश दिले. एका गोठ्याच्या बदल्यात घर देण्याच्या प्रकारावरून दाखल असलेल्या अर्जावर चौकशी करताना हा प्रकार उघडकीस आला.