वांझोळे येथे भरधाव लक्झरी बसने दुचाकीस्वाराला चिरडले
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे स्टॉप येथे भरधाव येणार्या लक्झरी बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, लक्झरीने दुचाकीस्वाराला फरफटत नेले. त्यातच मागील चाकाखाली सापडल्याने लक्झरीचे चाक अंगावून जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. रवींद्र शिवराम शिवगण (वय 45, वांझोळे) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ‘माचाळची राणी भैरी भवानी ट्रॅव्हल्स’ (नंबर एमएच 04 जीपी 1299) ही मुंबईहून साखरप्याच्या दिशेने जात होती. तर वांझोळे गावातील रवींद्र शिवगण हा देवरूखला दुचाकीवरून कामाला जात होता. दरम्यान, रिक्षाला ओव्हरटेक करताना लक्झरी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार बसच्या मागील चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकार्यांसह पंचनामा केला. ट्रॅव्हल्स चालकावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.