ऐन उन्हाळ्यात नदीला आला पूर…

संगमेश्वर : तालुक्यातील उमरे पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम  महिनाभर सुरू आहे. या तलावाच्या कालव्याचे दोन्ही दरवाजे नादुरुस्त झाल्याने कालव्याला पाणी सोडता येत नव्हते. मात्र, शुक्रवारी काम सुरू असतानाच हे दरवाजे अचानक उघडले गेले आणि पाणी नदीपात्रात घुसले. यावेळी नदीत पोहणारी मुले व ग्रामस्थांनी तत्परता दाखवल्यामुळे वाहून जाण्याचा मोठा अनर्थ टळला.
या कालव्याच्या कामाला महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली. सध्या शाळांना सुट्टी पडल्याने नदीत डुंबायला मुले गेली होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास फणसवणे भंडारवाडी, कळंबस्ते तेलीवाडीतील काही मुले नदीत अंघोळीला गेली होती. अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली. मुलांनी नदीच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बघता-बघता नदी गढूळ पाण्याने दुथडी वाहू लागली. जवळच काही महिला कपडे धुवत होत्या. त्यांनी एकमेकांना सावरत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीला तेलीवाडीतील नदीकिनारी घरे असणारे विनायक पाटील धावले आणि त्यांनी सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला. याबाबत अधिक चौकशी केली असता ज्या दरवाजाचे काम सुरू होते तो पूर्ण सडल्याने अचानक दरवाजा तुटून निघाल्याने हा प्रकार घडल्याचे तेथील कामगारांनी ग्रामस्थांना सांगितले. वास्तविक काम सुरू करत आसल्याची माहिती ग्रामस्थांना देणे आवश्यक होते. तसे न करता  हलगर्जीपणामुळे  मोठे संकट येथील ग्रामस्थांवर आले होते. दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला.
कालव्याला पाणी येत नसल्याने येथील शेतकर्‍यांना उन्हाळी पीक घेता येत नव्हते. पूर्वीप्रमाणे कालव्याला पाणी मिळावे, अशी शेतकर्‍यांची मागणी होती. गतवर्षी हे दरवाजे नवीन बसवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र ते दरवाजे  मागील अनेक वर्ष बंद असल्याने आणि धरणात पाणी साठा जास्त असल्याने व  पाऊस जवळ आल्याने हे काम स्थागित करण्यात आले होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button