
लांजातील ट्रॅव्हल्स चालकाला झोप झाली अनावर; कशेडी घाटातील उधळे येथे तीन वाहनांच्या अपघातात 1 ठार, 3 जखमी
खेड : मुंबई- गोवा महामार्गावरील उधळे गावानजीक झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकजण ठार तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. खासगी आराम बस चालकाला झोप अनावर झाल्याने बसने बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिली. त्यानंतर ती बोलेरो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर मागून जाऊन आदळली. या अपघातात बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी ठार तर बसमधील अन्य तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमींना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विरार येथून प्रवासी घेऊन लांजा येथे जाण्यासाठी निघालेली खासगी आराम बस पहाटे ३.३० वाजण्याच्या दरम्यान कशेडी घाट उतरून महामार्गावरील उधळे गावानजीक आली. या दरम्यान चालकाला झोप अनावरण झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. या अपघातात पिकअप व्हॅनचा बोनेट टँकरच्या चेसीखाली घुसला. भरधाव वेगातील खासगी आराम बसने जेव्हा पिकअप धडक दिली तेव्हा एका प्रवाशाच्या डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील आणखी तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. बोलेरो पिकअप चालक या अपघातात सुदैवाने बचावला आहे. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी महामार्गावर धाव घेत मदतकार्य केले. जखमी प्रवाशांना बसमधून उपचारांसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशाचे नाव उशिरापर्यंत समजले नव्हते. अधिक तपास पोलिस करत आहेत.