स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचत गटांच्या महिलांची विशेष उपस्थिती

महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्याकडून या महिलांचे कौतुक. अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात विशेष निमंत्रण


नवी दिल्ली, 15 : राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांसाठी राज्यातील लखपती दीदी आणि बचत गटाच्या प्रमुख आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी अशा एकूण 20 महिला सहभागी होणार आहेत.

आज प्रतिनिधिक स्वरूपात काही लखपती दिली आणि बचत गटातील महिलांनी कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांची भेट घेतली. यावेळी या महिलांनी आपली हस्तकला, खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादने भेट म्हणून निवासी आयुक्तांना दिली.

यंदाच्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी सातारा जिल्ह्यातील परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष स्वागत समारंभासाठी निमंत्रण मिळाले आहे. तसेच, सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी, बचत गट सदस्यांना आणि भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील श्रीमती रूपाली सत्यवान जाधव (कारंवडी), श्रीमती जयश्री शिवाजी जांभोडे (नायगांव), श्रीमती शैला शरद पवार (धोंडेवाडी), श्रीमती वैशाली राजेश धर्मे (रेठरे बुद्रुक), श्रीमती स्वप्नाली जितेंद्र जाधव (जांब खुर्द), श्रीमती सुवर्णा पांडुरंग देशमुख (कापील), श्रीमती मंगल सुरेश मारढेकर (कुदळ), श्रीमती रुबिना नसरुद्दीन मुलाणी (कुलालजाई), कुमारी मंगल दादासो हजारे (कोपर्डे हवेली), कुमारी शोभा विजय रांजणे (डापवाडी), श्रीमती छाया अजित कदम (अरळे), श्रीमती अश्विनी संदीप कदम (अरळे), श्रीमती भाग्यश्री मंदार जाधव (ओझर्डे), श्रीमती सरस्वती सुरेश निकम (मुमगासेवाडी) श्रीमती सुजाता चंद्रकांत महांगडे (पारखंडी), भंडारा जिल्ह्यतील श्रीमती उषा राजू कावळे, श्रीमती रेखा सुधर चाचणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीमती आशा संभाजी जाधव , श्रीमती प्रज्ञा प्रमोद सुर्वे यांचा समावेश आहे.

निवासी आयुक्त आर. विमला यांनी या दीदींच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांना या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी मिळालेल्या निमंत्रणाबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “लखपती दीदींनी आपल्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने ग्रामीण भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. साताऱ्याच्या अंजना कुंभार यांना राष्ट्रपती भवनात आणि इतर दीदींना लाल किल्ल्यावर निमंत्रित केले जाणे हे त्यांच्या यशाचा आणि देशाच्या सक्षमीकरण मोहिमेचा गौरव आहे. महाराष्ट्र सदन त्यांच्या या प्रवासात पूर्ण सहकार्य करेल.”

निवासी आयुक्त कार्यालयाकडून सहकार्य
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन यांनी निवासी आयुक्त कार्यालयाकडून बाजारपेठ आणि प्रदर्शनांमध्ये सहभागाची संधी तसेच आवश्यक समर्थनाची विनंती केलेले निवेदन प्रतिनिधींनी यावेळी आर. विमला यांना दिले. श्रीमती विमला यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत या महिलांना त्यांची उत्पादने राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अशा संधीमुळे ग्रामीण उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

अंजना कुंभार: प्रेरणादायी यशोगाथा
सातारा जिल्ह्यातील परळी गावातील अंजना शंकर कुंभार यांनी पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मातीच्या सुबक वस्तू, गणेश मूर्ती, टेराकोटा शिल्पकला, मातीची भांडी आणि खेळणी तयार केली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानांतर्गत त्यांनी ‘जय सदगुरू कृपा’ नावाचा स्वयंसहाय्य गट स्थापन केला, ज्यामध्ये 12 महिला कार्यरत आहेत. या गटाने दीड वर्षांपूर्वी ‘उमेद’ योजनेअंतर्गत 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले, ज्याच्या मदतीने त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला आणि पुणे, मुंबई, पाटण आणि सातारा येथील बाजारपेठांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या यशाची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचली आहे. श्रीमती कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले असून, त्या आपल्या पतीसह या समारंभात सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button