
रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका तळ्यात मळ्यात?ते पत्र म्हणजे शासकीय भाग -अनिल परब
कोकणात होणार्या रिफायनरीवरून वाद सुरू झाला आहे समर्थकांवर रिफायनरी विरोधकही पुन्हा एकदा सरसावले आहेत कोकणातील रिफायनरीला शिवसेनेचा पाठिंबा की विरोध? यावर चर्चा अजूनही सुरूच आहेत. त्याला कारण आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र.या पत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील बारसू गाव आणि आसपासची जवळपास 13 हजार एकर जागा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. पण, त्यानंतर देखील शिवसेनेची भूमिका स्थानिकांबरोबर राहण्याची असल्याचं सेनेच्याच नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, रिफायनरीबाबत ठोस भूमिका घेण्यास शिवसेनेची गोची होत नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. कारण शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं याचा अर्थ स्पष्ट आहे.’ शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. पण, रिफायनरीबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारल्यानंतर मात्र परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या अनिल परब यांनी मात्र ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत पत्र लिहिणे हा शासकीय भाग आहे. स्थानिकांना विश्वासात घेत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत रिफायनरीबाबत निर्णय घेतला जाईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य बाब म्हणजे अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. रत्नागिरी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी रिफायनरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यामुळे शिवसेनेची भूमिका नेमकी काय? याबाबत चर्चा रंगली आहे
www.konkantoday.com