चिपळुणात शिवनदीत टाकला जातोय कचरा
चिपळूण न.प. प्रशासन, बचाव समितीकडून वारंवार विनंती करूनदेखील शिव नदीत कचरा टाकला जात आहे. बेजबाबदार नागरिकांकडून शिव नदीमध्ये टाकावू प्लास्टीकच्या बाटल्या टाकल्या गेल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टीक बाटल्यांचा खच शिव नदीपात्रात दिसून येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रवाहीत होणार्या शिव नदीतील झाडेझुडपे, कचरा व गाळ काढण्याचे काम नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शासनाने सुरू केले आहे. गाळ काढल्यामुळे शिव नदीचे पात्र रुंद व खोल होत आहे. त्याचबरोबर पात्रातील कचरा देखील पात्राबाहेर जात आहे. गाळ काढण्याच्या पूर्वीपासून शिव नदीत नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या टाकाऊ वस्तुंचा कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले. रोटरी क्लबच्या माध्यमातून पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळी बसविण्यात आली. प्रशासनाकडून प्लास्टीक बाटल्या व कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीचे नियोजन करण्यात आले. सद्यस्थितीत शिव नदीतील गाळ काढण्याचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले आहे. परिणामी, पात्राची रूंदी व खोली वाढून पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकिकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र नागरिकांकडून शिव नदीपात्रात प्लास्टीक बाटल्या टाकण्यात येत आहेत.