पाण्यात वाहत जाणारा मालक पुन्हा दिसलाच नाही’… अखेर कुत्र्यानेही सोडले प्राण
चिपळूण : आपल्या मालकासोबत तोही कोळकेवाडी धरणाच्या पाण्यात पोहायला गेला होता. परंतु दुदैवाने आपला मालक पाण्यात वाहत जात असताना त्याने पाहिले होते. मालकाला वाचवण्यासाठी तोही धावत गेला… बराचवेळ भुंकत राहिला मात्र आपला मालक पाण्यातून परत आलाच नाही हे त्याच्या लक्षात आले. या दु:खात सायंकाळी त्याने काहीच खाल्ले नाही आणि अखेर दुसर्या दिवशी त्याने आपला प्राण सोडला. या मालकाचे नाव आहे सुजय गावठे आणि त्यांच्या कुत्र्याचे नाव आहे कॅस्पर. प्राणीही आपल्यावर प्रेम करतात… जीव लावतात… हे चिपळूण येथील घटनेतून अनेकांना अनुभवायला मिळाले आहे.
कोळकेवाडी धरणाजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. यातील एका तरुणीचा मृतदेह गुरूवारी मिळाला. सुजय गावठे याचा मृतदेह अद्याप मिळून आलेला नाही. सुजयबरोबर त्याचा कुत्रा कॅस्पर पोहण्यासाठी गेला होता. मालक वाहून जाताना पाहून तो मागेमागे धावला…भुंकतही राहिला. मात्र आपला मालक आपल्याला दिसलाच नाही, या दु:खात या लाडक्या श्वानानेही प्राण सोडला. एकूण चौघेजण या ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघे वाचले तर दोघेजण बुडाले. दोन दिवस महाड येथील रेस्क्यू टीमने धरणात सुजयचा शोध घेतला, मात्र शुक्रवारी दुपारी हे शोधकार्य थांबविण्यात आले.