गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईचा दाह कमी
रत्नागिरी : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात 20 गावातील 25 वाड्यांना चार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 2 हजार 287 लोकांना हे पाणी पुरवले जात आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील टंचाई निर्माण होणार्या गावातील विहिरींसह पाणीसाठ्यांवरील पातळी स्थिर राहिली आहे. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशनमध्ये अनेक गावांचा समावेश करण्यात आला असून पाणी योजनांची कामेही चालू आहेत. सध्या खेड, चिपळूण आणि लांजा या तीन तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून चार टँकरने पाणी दिले जात आहे. दोन खासगी आणि दोन शासकीय टँकरची मदत घेतली जाते. आतापर्यंत 170 फेर्या टँकरने पाणी पुरवण्यात आले आहे. सव्वा दोन हजार लोकांना हे पाणी देण्यात आले आहे. तीन तालुक्यांव्यतिरिक्त सहा तालुक्यात एकही टँकर धावलेला नाही. गतवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 35 गावांना टँकरने पाणी पुरवले जात होते.