ना. सामंत म्हणाले… आ. शेखर निकमांना निवडणुकीत मताधिक्य कसे मिळाले हे आम्हा दोघांनाच माहीत
सावर्डे : आमदार शेखर निकम हे आपले चांगले मित्र आहेत. राज्यातील सर्व मंत्र्यांचे आवडते आमदार म्हणून शेखर निकम हेच आहेत. त्यांचे व माझे अनेक मित्र आम्हाला दोघांनाही मदत करतात. आ. शेखर निकम यांनी विधानसभा निवडणुकीवेळी पन्नास हजार मतांचे लीड तोडून 35 हजारांचे मताधिक्य कसे मिळविले याचे गणित आम्हाला दोघांनाच माहीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात केले आणि सार्यांच्याच भुवया उंचावल्या. निमित्त होते खरवते-दहिवली येथील माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या पुतळा अनावरणाचे.
यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खा. सुनील तटकरे, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, माजी आ. सुभाष बने, माजी आ. संजय कदम, मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे, माजी आ. रमेश कदम, शिवसेनेचे राजेंद्र महाडिक, प्राचार्य सुनितकुमार पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, पूजा निकम यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी होते.
स्व. गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व मा. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात ना. सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे आमदार निकम यांच्यासोबतच्या मैत्रीचे पैलू यावेळी शिवसेनेचे ना. उदय सामंत यांनी उलगडले. यावेळी ना. सामंत यांनी आ. शेखर निकम यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.