तुझ्या मुलीने गळफास का घेतला? वडिलांना विचारलेल्या प्रश्नाने संताप; बदनामी केल्याच्या रागातून बापलेकांनी केली मारहाण
रत्नागिरी : तुझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या का केली? असे विचारल्याच्या रागातून आणि आपल्या मुलीची बदनामी केल्याच्या कारणातून राजीवडा येथील बोट मालकाच्या डोक्यात वडील आणि मुलांनी लोखंडी सळी मारली. यातून उपचार घेत असताना जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन “तू अपघात विभागाच्या बाहेर ये, तुझा मर्डर करतो” अशी ठार मारण्याची धमकीही या कोकणनगर येथील बाप-लेकांनी दिली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर नुरुद्दीन सोलकर, साहील समीर सोलकर, सैफुल्ला समीर सोलकर (सर्व रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जैनुद्दीन अहमद सुवर्णदुर्गकर (वय 65, राहणार राजीवडा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर सोलकर हा सुवर्णदुर्गकर यांच्या बोटीवर तांडेल म्हणून कामाला होता. आठ दिवसांपूर्वी समीर सोलकर याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे समीर सोलकर बोटीवर कामासाठी येत नव्हता.
22 एप्रिल रोजी तो बोटमालक सुवर्णदुर्गकर यांच्या घरी गेला असता तुझ्या मुलीने गळफास का घेतला? असे विचारले. या प्रश्नाने वडील सोलकर यांना राग आला. 26 एप्रिल रोजी समीरने सुवर्णदुर्गकर यांच्या घरासमोर जाऊन माझ्या मुलीची बदनामी करतोस, असे म्हणून शिवीगाळ करत लोखंडी सळी त्यांच्या डोक्यात मारली. त्यानंतर ते जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. तेव्हा तेथे जाऊन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.