‘लोटिस्मा’च्या कवी माधव, कवी आनंद पुरस्कारांचे वितरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने कवी माधव आणि कवी आनंद या दोन ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ कथा, कविता, ललित साहित्य प्रकारातील उत्तम पुस्तकांना देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांचे वितरण काल (दि. २४) वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि को.म.सा.प.च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य अॅड. यशवंत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय लवेलचे प्रा. तिरुपती इल्तापवार होते.
यावर्षीचा कवी माधव पुरस्कार मिरजोळी येथील अख्तर अब्बास दलवाई यांच्या ‘निरांजन हे तेवत राहो’ या कादंबरीला तर कवी आनंद पुरस्कार प्रा. मनाली बावधनकर यांच्या ‘ओघळलेले मोती’ या ललित लेख संग्रहाला प्रदान करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथभेट आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त लेखकांसह गुहागर मसापचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक होते. चितळे यांच्याहस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल आणि ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार निवड समितीत ज्येष्ठ कवी, समीक्षक अरुण इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. संतोष गोनबरे, प्रा. अंजली बर्वे, चंद्रकांत राठोड यांनी काम पाहिले. ‘लेखनात सखोलता असणे ही लेखकाची परीक्षा असते. कादंबरी लिहिणे काहीसे कठीण काम आहे. आज ललित लेखन मोठया प्रमाणावर होत आहे. त्याचे कौतुक आहे. लालित्य आहे असं हे ललित लेखन आहे.’ असे सांगून प्रमुख पाहुणे कदम यांनी उपस्थित साहित्य रसिकांना पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. तिरुपती इल्तापवार यांनी बोलताना लोटिस्मा हाच चिपळूणच्या सांस्कृतिक जडणघडणीचा केंद्रबिंदू असल्याचे म्हटले. ते म्हणाले, ‘लोटिस्मात असंख्य मोठया लेखकांना ऐकलं. त्याची स्पंदन मनात आहेत. आजचे पुरस्कार ही मायेची उब आहे. वाचनालयाच्या कलादालनातील कोकणरत्न आपल्याशी बोलतात असं वाटतं. वाचनालयासारखी श्रद्धाकेंद्र वाढायला हवीत.’ असे ते म्हणाले.
अख्तर दलवाई यांच्या पुस्तकाचा परिचय कथाकार प्रा. संतोष गोणबरे यांनी करून दिला. ते म्हणाले, ‘दोन्ही पुरस्कार यंदा कोकणात आलेले आहेत. नेहमी हे पुरस्कार राज्यभर फिरत असतात. “निरांजन हे तेवत राहो” मधील तेवत राहाण्याची मांडणी महत्वाची आहे. लेखकाची भावना व्यक्त करण्याची क्षमता कादंबरीतून जाणवते. मराठी संस्कृतीचा पगडा कमी झालेला नाही. हे जाणवणारी ही कादंबरी आहे. लेखकाने विषय भरकटू न देता विषयाची मांडणी केल्याबद्दल गोणबरे यांनी शुभेच्छा दिल्या. कादंबरीचे लेखक अख्तर दलवाई म्हणाले, ‘लिहून झाल्यावर पुस्तकात काहीतरी राहिलंय असं वाटतं. या निमित्ताने साहित्याच्या वारीत मी सहभागी झालो आहे.’ मानवी नात्यात एकप्रकारचा संकुचितपणा आलेला आहे, हे मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दलवाई म्हणाले. प्रा. मनाली बावधनकर यांच्या पुस्तकाचा परिचय साहित्यिक रविंद्र गुरव यांनी करून दिला. चाळीस ललितबंधांच्या माध्यमातून हातून निसटलेले क्षण मांडलेले आहेत असे ते म्हणाले. जणू शब्दांची गुंफण करावे असे लेख आहेत. यातून मनातली उकल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ललित म्हणजे मनामनाच फलित असतं याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. मनात उसळलेलं आंदोलन प्रवाही शब्दात मांडण्यात लेखिका यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. लेखिका प्रा. मनाली बावधनकर यांनी वाचकांच्या मिळालेल्या प्रतिसादातून हे लेखन झाल्याचं म्हटलं. हे निसटलेले क्षण आहेत. मनोविश्लेषणात्मक विचार करताना हे लेखन घडत गेलेले आहे. आपलं लेखन वाचकांना पटतंय हे लक्षात आल्यावर ओघळलेले मोती हे त्याचं पुस्तकरूप तयार झाल्याचं बावधनकर म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी केले. त्यांनी वाचनालयाच्या विविध पुरस्कारांची माहिती दिली. नवीन वस्तुसंग्रहालय सर्वांच्या सहकार्याने उभे राहील असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत धीरज वाटेकर यांनी केले. वाचनालयाचे संचालक मधुसूदन केतकर यांनी आभार मानले. यावेळी साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button