
रत्नागिरी क्रांतिनगर येथे लोखंडी रॉड दांडक्याने मारहाण; आठजणांवर गुन्हा
रत्नाागिरी : शहरानजीकच्या क्रांतिनगर येथे धान्य वाटपाच्या वादातून एकाला आठ जणांनी लाकडी दांडका आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना गुरुवार 21 एप्रिल रोजी रात्री 11 वा. घडली आहे. महंमदपीर रिफाई, आसिफ रिफाई, तोहिद मदार, याकुब मदार, महंमदअली मदार, नासीर रिफाई, गफूर शेख (सर्व रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) आणि महंमद हनिफ यांचा जावई (रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मेहबूब शेख अली रिफाई (38, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवार 21 एप्रिल रोजी धान्य वाटपाच्या कारणावरून त्यांच्यात आणि महंमदपीर रिफाईत वाद होऊन तो वाद मिटलाही होता. त्याच दिवशी रात्री 11 वा. मेहबूब शेख घराबाहेर बसलेले असताना राखाडी रंगाची इको गाडी आणि जांभळ्या रंगाच्या ट्रकमधून संशयित आठ जण तिथे आले. त्यांनी लाकडी दांडका आणि लोखंडी रॉडने शेख यांच्या डोक्यात, खांद्यावर, पाठीवर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.