रत्नागिरी पोलिस सतर्क
रत्नागिरी : कर्ला, राजिवडा, माजगाव आणि शहरातील विठ्ठल मंदिरात शहर पोलिसांनी शांतता बैठक पार पडली. यावेळी अक्षय्य तृतीया आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोतवडे, नेवरे, हरचेरी, चांदेराई, उक्षी, सोमेश्वर येथील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांची पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. हिंदू व मुस्लिम समाजातील एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत. रमजान महिना सध्या सुरू आहे. याच दरम्यान अक्षय्यतृतीया येत असल्याने दोन्ही समाजाने सण उत्साहात व शांततेत साजरे करण्यासाठी पोलिस यंत्रणेने पावले उचलली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील मुस्लिम व हिंदूबहूल भागात बैठका घेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप हे उपस्थित होते. यावेळी जयश्री देसाई म्हणाल्या की शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नका, सोशल मीडियाचा वापर जपून करा, गावात काही अनुचित घडल्यास पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले.