
नो टेन्शन! विद्यार्थ्यांना मिळणार आता फक्त सात दिवसातच कागदपत्रे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये अर्ज केल्यानंतर केवळ सात दिवसांच्या आतच त्यांना शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, वार्षिक निकालपत्र आणि त्यासोबतच इतर कागदपत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 1 मेपासून विविध लोकसेवांची हमी देण्याचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षण आयुक्तांनी त्याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत. लोकसेवा हमीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत शाळा आणि शिक्षकांच्या इतर कागदपत्रांसोबत तब्बल 105 प्रकारच्या सेवांचा समावेश असेल. शालेय शिक्षण विभागाच्या सेवा हमीच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचणार आहे. त्यासाठी एक प्रकारची हमीही मिळणार आहे. सर्वाधिक सेवा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांशी निगडित आहेत. त्यामुळे प्रत्येक कामकाजासाठी शिक्षण विभागातील कार्यालयांना वेळोवेळी माराव्या लागणार्या चकरा कमी होणार आहेत. त्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने ठराविक कालमर्यादा ठरवली आहे. त्या कालमर्यादेतच शिक्षण विभागातील अधिकार्यांनी सेवा पुरवायची आहे. अन्यथा जबाबदार अधिकार्यावर कारवाईचे शिक्षण आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.