जिल्ह्यातील 3 लाख विद्यार्थ्यांना सोमवारपासून जंतनाशक गोळ्या
रत्नागिरी : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागामध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. वर्षातून दोन वेळेस जंतनाशक गोळी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 3 लाख 11 हजार 595 लाभार्थींना 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत जंतनाशक गोळीचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. या मोहिमेंचा 1 ते 19 वयोगटातील जास्तीत जास्त मुलांनी लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात 65 प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र 378, शाळा 3 हजार 151 व अंगणवाडी 2 हजार 871 अशा एकूण 6 हजार 467 संस्थांमध्ये व समुदायस्तरावर घरोघरी जाऊन, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्या मुला-मुलींना 25 रोजी जंतनाशक गोळी दिली नसेल त्यांना 29 मे रोजी गोळी देण्यात येणार आहे.