राजीवडा येथे घरफोडी करणार्याच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी : राजीवडा येथे घरफोडी करून 9 हजार 700 रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणार्या चोरटयाला पोलिसांनी अटक केली आहे. आरबाज बशिरमियाँ मुल्ला (वय 31, रा. जामा मशिदीसमोर, राजीवडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नईमा आलमगिर वस्ता (वय 49, सध्या हडपसर, पुणे) यांच्या मालकीच्या बंद घरातील कपाटाचे कुलूप तोडून स्टीलच्या डब्यातील 1 हजार रुपयांची सोन्याची कर्णफुुले, 2 हजार 200 रुपयांचे सोन्याचे टॉप, 5 हजारांची सोन्याची चेन, 1 हजार रुपयांचे चांदीचे पैजण, 500 रुपयांची लहान पैंजण अशा 9 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्याने डल्ला मारला होता. ही घटना फेब्रुवारी 2021 ते 20 एप्रिल 2022 या दरम्यान घडली होती. याबाबतची फिर्याद नईमा यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरबाज मुल्ला याला ताब्यात घेतले. न्यायालयासमोर त्याला उभे केले असता न्यायालयाने 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.