भोस्ते घाटातील एकाच वळणावर सातत्याने अपघात; आणखी एक ट्रक उलटून दोन जण जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील वळणावर कर्नाटक येथून टाईल्स घेऊन दापोलीला जाणारा ट्रक संरक्षण कठड्याला आदळला. शनिवारी दि.23 रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटून ही घटना घडली. या अपघातात चालक आणि सहायक दोन जण जखमी झाले. ट्रकचे नुकसान झाले आहे. या घाटात वारंवार अपघात होत आहेत. चंद्रकांत उत्तेदार (27, रा. शहाबाद, कर्नाटक) हा ट्रक (एमएच 17 बिडी 2517) कर्नाटकातून टाईल्स घेऊन दापोलीत जात होता. भोस्ते घाटातील वळणावर आला असता अपघात झाला. चौपदरीकरणात अनेक नागमोडी वळणे काढण्यात आली असली तरी येथील वळण धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या वळणावर गेल्या वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत.