संगमेश्वर तालुक्यात गारांचा पाऊस; वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसाने आंबा गेला पडून
देवरूख : हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाज संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी खरा ठरला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या साखरपा येथील टोकापासून ते अगदी संगमेश्वरच्या पट्ट्यात जोरदार वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडला. देवरूखमध्ये तर गारांचा पाऊस पडला. देवरूख मातृमंदिर येथे रस्त्यावर झाड पडल्याने ओझरे गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली. वादळी स्थिती लक्षात घेऊन महावितरणने तालुक्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
वादळी वार्यासह झालेल्या पावसाने आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकण्यासाठी तयार झालेला आंबा वार्याने पडून गेला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी आंबा बागायतदारांतून होत आहे. ऐन हंगामात झालेले हे नुकसान न भरून निघणारे आहे.
जोरदार वार्यासह झालेल्या या पावसात काही ठिकाणी झाडे कोसळली. अचानक आलेल्या या पावसाने शेतकर्यांची धांदल उडवली. शेतामध्ये सध्या भाजावळीची कामे सुरू आहेत. अचानक आलेल्या या पावसाने शेतकर्यांनी शेतात टाकलेला पालापाचोळा पावसात भिजला. शेणी, गवत, कवळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामीण भागात शेतकर्यांनी लाकडे फोडून ती वाळवण्यासाठी टाकण्यात आली होती. ती सुद्धा भिजली आहेत.