
खेड मध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आंबा पिकाचे मोठे नुकसान, आंबा बागायतदारांची चिंता वाढली
खेड दि २३ हवामान खात्याने वर्वतलेल्या अंदाजानुसार आज खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारे वाहू लागल्याने अनेकांची त्रेधातिरपट उडाली. तालुक्याच्या काही भागात गारांचाही वर्षाव झाला. वाऱ्याचा वेग इतका होता कि निसर्ग आणि तोकते वादळाची आठवण झाली .
कोकण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरवत आज सायंकाची ६ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यात वादळ धडकले आणि निसर्गाचा तांडव सुरु झाला. बघता बघता वाऱ्याचा जोर इतका वाढला की प्रत्येकांच्या उरात धडकीच भरली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मुळून पडले. काही ठिकाणी झाडांच्या फांदया वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजप्रवाह खंडित झाला त्यामुळे संपूर्ण तालुका अंधारात बुडून गेला. वादळी वाऱ्याबरोबर आकाशात धुळीचे लोट उठल्याने काही दिसेनासे झाले. वादळी वाऱ्याबरोबरच ढगांचाही गडगडाट सुरु झाली आणि जीवाचा थरकाप उडाला. निसर्गाच्या प्रकोपाला रोखायचे कसे? हा प्रश्न साऱ्यांनाच सतावू लागला.
निसर्ग आणि तोकते वादळ झाले त्या दरम्यान जी भयावह परिस्थती निर्माण झाली होती तीच परिस्थती आज आलेलया एक तासाच्या वादळाने निर्माण केली होती. खेड शहरातील गोळीबार मैदानावर जुनिअर चेंबर्स या सेवाभावी संस्थेचा जेसी फेस्टिवल हा इव्हेंट गेले दोन दिवस सुरु आहे. आज या फेस्टिवलच्या तिसरा दिवस होता. फेस्टिवल निमित्त गोळीबार मैदानावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलस लावण्यात आले आहेत. शिवाय या ठिकाणी फूडमॉल आणि आनंदमेला ही आहे. आज सायंकाळी झालेल्या वादळामुळे जेसी फेस्टिवलचे आतोनात नुकसान झाले आहे. मैदानावर उभारण्यात आलेले स्टॉलस जमीनदोस्त झाले आहेत. मैदानावर घेण्यात आलेल्या तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाला आहे. आनंदमेला फूड मॉल्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी आधीच हापूसचे पीक अतिशय कमी आहे त्यामुळे अद्याप खेडच्या मार्केटमध्ये हापूस दाखल झालेला नाही त्यातच आज झालेल्या वादळामुळे झाडावर असलेल्या आंबा मोठया गळून पडल्याने आंबा बाहयतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.