राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बहुचर्चित असा ‘भोंगा’ चित्रपट अखेर ३मे ला प्रदर्शित होणार
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बहुचर्चित असा ‘भोंगा’ चित्रपट अखेर प्रदर्शित होतोय. ३ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हा चित्रपट देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे प्रस्तुतकरते, मनसे नेते संदीप देशपांडे, चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन ही घोषणा केली.यावेळी चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे यांची देखील उपस्थिती होती.
“लॉकडाउनच्या काळातच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करणार होतो, मात्र योग्य मुहूर्त मला असं वाटतं की देवानेच आम्हाला आता दिला. मी आणि माझे सहकारी संदीप देशपांडे आम्ही दोघांनी एक चित्रपट प्रस्तूत केलाय, माझे मित्र अमोल कागणे जे निर्माते आहेत, यांनी त्याची निर्मिती केली. या चित्रपटाच्या पोस्टरची अनावरण आज आम्हाला करायचं होतं, हा चित्रपट ३ मे रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होतोय.” अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना दिली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २ एप्रिल रोजी जी गुढीपाडव्याची सभा झाली. त्यानंतर भोंग्याच्या संदर्भातील विषय राज ठाकरे यांनी सातत्याने प्रत्येक भाषणात मांडला. महाराष्ट्राचं नाही तर देशाचं वातावरण या विषयाने ढवळून निघालं. राज ठाकरे यांचं वाक्य होतं, भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे. याच एका वाक्याच्या आजुबाजुने भाष्य करणारा हा चित्रपट आहे. याच समस्येवर संपूर्ण चित्रपटात अतिशय सुंदर पद्धतीने भाष्य केलं गेलेलं आहे. त्यामुळे हा विचार सगळ्यांपर्यंत पोहचला पाहिजे, या उद्देशाने मी, अमेय खोपकरे, निर्माते अमोल कागणे विचार केला की हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचं एक प्रभावी माध्यम असू शकेल, त्यामुळे ३ मे रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जात आहे.
www.konkantoday.com