महावितरणने मागितलेली डिपॉझिट रक्कम ही ग्राहकांसाठी नाहक भुर्दंड – ॲड. दीपक पटवर्धन.
महावितरणने नियमित विजबिलांसोबत डिपॉझिट रक्कमेची मागणी करून ग्राहकांवर अतिरिक्त बोजा टाकला आहे. सर्व ग्राहकांकडून महावितरणने सुरुवातीला डिपॉझिट घेतले आहे. आता नव्याने डिपॉझिटची मागणी कशासाठी याबाबतही तपशील देण्याचे महावितरणने टाळले आहे. वीज आकारदरात वाढ होत असतानाच ग्राहकांकडून नव्याने डिपॉझिट घेणे हे ग्राहकांवर अन्याय करणार, अतिरिक्त भुर्दंड लावणारे आहे. ही डिपॉझिटची मागणी महावितरणने मागे घ्यावी. ग्राहकाला वेठीस धरण्याचा प्रकार महावितरणने करू नये. कोणत्या कारणासाठी डिपॉझिट भरावयाचे, भरलेल्या डिपॉझिटवर किती टक्क्यांनी व्याज देणार, घेतलेले डिपॉझिट परत कधी देणार की, डिपॉझिट मधून नियमित बिल वळते करून घेणार या कशाबद्दलही माहिती न देता मागितलेले डिपॉझिट हे मनमानी प्रवृत्तीचे लक्षण आहे. महावितरणाने या डिपॉझिटबाबत योग्य तपशीलवार माहिती द्यावी. तोपर्यंत डिपॉझिटची रक्कम ग्राहक भरणार नाहीत, अशी परखड भूमिका घेऊन भा.ज.पा. रत्नागिरी उद्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. अशी माहिती भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.