
मुंबई-गोवा महामार्गावरील नेरके येथे अवघड वळणावर एसटीची उभ्या ट्रकला धडक
राजापूर : तालुक्यातील नेरके येथील मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड वळणावर एसटी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने एसटीने समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजून धडक दिल्याने अपघात झाला आहे. या प्रकरणी एसटी बस चालक राजेंद्र रमेश दळवी (तिवरे, राजापूर) याच्याविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी हा अपघात झाला आहे. यात एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र दळवी हे सोमवारी सायंकाळी चुनाकोळवण-राजापूर ही बसफेरी घेवून राजापुरकडे येत असताना सायंकाळी ४ वाजण्याया सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील नेरकेवाडी येथील अवघड वळणावर आले असता या ठिकाणी असलेल्या तीव्र उतारा व अवघड वळणाचा अंदाज न आल्याने एसटी बसवरील त्यांचा ताबा सुटल्याने ही एसटी बस समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जावून आदळली. यामध्ये बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघाताचे वृत कळताच आगार प्रमुख अजित गोसार्डे यांसह अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यातील किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले.
या प्रकरणी स्वप्नील शंकर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी बसालक राजेंद्र दळवी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) तसा मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.




