
रामभाऊ साठे स्मृत्यर्थ ‘लोटिस्मा’स एकवीस लाखांची देणगी
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला तालुक्यातील मालघर येथील नामवंत शिक्षक कै. रामभाऊ साठे यांच्या स्मृत्यर्थ साठे कुटुंबियांनी एकवीस लाख रुपयांची देणगी दिली आहे. वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात साठे कुटुंबियांच्या वतीने लेखिका सौ. संध्या साठे जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांचेकडे एकवीस लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. रामभाऊ साठे हे शिक्षण क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व होते. चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील रामपूर, भोम, मार्गताम्हाने, ओमळी, जामसूद, पाटपन्हाळे, हेदवी, गुणदे आदी ठिकाणी माध्यमिक शाळा सुरु करण्यात आमदार कै. तात्यासाहेब नातू यांच्यासोबत रामभाऊंचा मोलाचा वाटा होता. अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित कामकाज हे त्यांचे वैशिट्य होते. रामपूर येथील मिलिंद हायस्कूलमध्ये त्यांनी मुख्याध्यापक पद भूषविले होते. निवृत्तीनंतर त्यांनी मालघर येथे गुरुकुल माध्यमिक शाळा सुरु केली. वाचनाची आवड आणि इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेल्या रामभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांनी ग्रंथालयाला एकवीस लाख रुपयांची देणगी दिली. यावेळी संस्थेचे कार्यवाह विनायक ओक,कोषाध्यक्ष, राम दांडेकर, राष्ट्रपाल सावंत, मनिषा दामले, मधुसूदन केतकर, संजय शिंदे, अविनाश पोंक्षे आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला दिलेल्या देणगीबद्दल वाचनालयाच्या पुरस्कार समितीचे प्रमुख अरुण इंगवले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
www.konkantoday.com