गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात लाखो भाविकांची मांदियाळी; अंगारकी चतुर्थी यात्रौत्सव उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक

गणपतीपुळे : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवारी १९ एप्रिल रोजी अंगारकी चतुर्थी यात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, ग्रामपंचायत गणपतीपुळे व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने चांगली व्यवस्था व नियोजन करण्यात आले होते.

स्वयंभू गणेश मंदिर पहाटे साडेतीन वाजता खुले करण्यात आले. त्यानंतर प्रारंभी स्थानिक पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. यावेळी रांगांचे नियोजन चांगले करण्यात आले होते.
सायंकाळी साडेचार वाजता मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत संस्थानचे सर्व पंच मंडळी, पुजारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दर्शन रांगांवर सावलीची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय भाविकांसाठी संस्थानाने केली. या उत्सवानिमित्त घाटमाथ्यावरून सांगली, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, मिरज, कराड, इस्लामपूर इत्यादी ठिकाणाहून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिलीच निर्बंधमुक्त अंगारकी असल्याने यावेळी आपल्या स्वयंभू गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती सोमवारी सायंकाळपासूनच गणपतीपुळे येथे दर्शविली होती. यावेळी आलेल्या भाविकांना घाटमाथ्यावरील विविध गणेश मंडळाने खिचडी प्रसादाचे वाटप केले. यात्रा उत्सव पार पडण्यासाठी घाटमाथ्यावर विविध दुकानदार देखील दाखल झाले होते. आलेल्या सर्वच भाविकांनी श्रींच्या दर्शनाबरोबरच यात्रा उत्सवानिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटला.

जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग व अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा पोलीस अधिकारी, दीडशे पोलीस कर्मचारी व 30 दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी कार्यरत होते. समुद्र परिसरात जनजागृती करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. यावेळी विशेषतः गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावर ध्वनीक्षेपकाद्वारे धोक्याच्या सूचना देऊन भाविकांना समुद्र स्नान करताना कमी पाण्यात समुद्रस्नान करण्याचे आवाहन केले.

या अंगारकी चतुर्थी निमित्ताने आलेल्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही समस्या व तक्रारी उद्भवू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ. शंतनु वायकर व डॉ. मधुरा जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी दक्ष राहून काम केले.

शुंडा स्थान गणपतीपुळे
पालखी सोहळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button