बागायतदारांना लाखोंची बिले आकारणार्यांना ना. सामंत यांनी धरले धारेवर; ‘कोकण टुडे’ने मांडली होती व्यथा, बागायतदारांचा प्रश्न मार्गी
रत्नागिरी : जिल्ह्यातील फळ बागायतदारांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या होत्या. याचे वृत्त कोकण टुडे ने प्रसिद्ध केले होते. बागायतदारांची व्यथा यातून मांडण्यात आली होती. त्यानंतर लगेचच या प्रकाराची दखल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली व संबंधित अभियंत्यांना धारेवर धरले. थेट ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्री नितीन राऊत यांनी वीज जोडण्या तत्काळ जोडून द्या, असे आदेश दिले. शेतकर्यांच्या बाबतीत स्वतःचे विचार अमलात न आणता शासनाची भूमिका वठवा, अशीही समज त्यांना दिली. दरम्यान, आंबा बागायतदारांनी उठवलेल्या आवाजाची दखल घेतल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 970 शेती पंप धारकांना फायदा होणार आहे. पावस पंचक्रोशीतील सुमारे 70 जणांच्या जोडण्या तोडल्या होत्या. त्यातील काहींची वीज पैसे भरून घेतल्यानंतर सुरू केली
आहे. मंत्री सामंत यांच्याकडे पावस येथील लाईक फोंडू, आंबा उत्पादक बावा साळवी, अक्रम नाखवा, नंदू मोहिते, अमृत पोफडे, इम्रान काझी आदींनी आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या कारभाराचा पाढा वाचला होता. हे वृत्त कोकण टुडेने प्रसिद्ध केले होते. गणपतीपुळेतील बैठकीत मंत्री सामंत यांनी बैठकीला उपस्थित विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता यांना आंबा बागायतदारांची वीज जोडणी तोडल्याच्या वृत्ताबाबत जाब विचारला. शेतकर्यांची वीज जोडणी तोडायची नसतानाही ती का तोडली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रतिप्रश्न करत मंत्री सामंत यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. हा विषय तत्काळ निकाली काढण्यासाठी मंत्री सामंत यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कार्यकारी अभियंत्यांशी दुरध्वनीवरूनच बोलणे करून दिले. यामुळे आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.