रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद
रत्नागिरी : शहरातील पंधरामाड, मुरुगवाडा, खडप मोहल्ला येथे टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीटाक्यांशी जोडायची आहे. या कामासाठी सोमवारी 18 रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी शहरातील नवीन नळपाणी योजनेचे काम आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. सुमारे 120 कि.मी. ची अंतर्गत मुख्य जलवाहिनी टाकायची होती. त्यातील पंधरामाड, खडप मोहल्ला, मुरुगवाडा या तीन झोनमधील जलवाहिनी टाकण्याचे काम शिल्लक राहिले होते. हे काम आता पूर्ण झाले असून ही जलवाहिनी साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी असलेल्या टाक्यांशी जोडण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी रत्नागिरी शहराचा सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात पाणी पुरवठ्याचे 14 झोन असून त्यातील 11 झोन सुरु झाले आहेत. नाचणे जलशुद्धीकरण केंद्र आणि पानवल धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या पाणी योजनेचे 100 टक्के काम पूर्ण होणार आहे.