
रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांना आकारली लाख-सव्वालाखांची वीजबिले
रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक बागायतदारांची वीज बिले कृषी पंपाला पूरक दरानुसार न आकारता ती सर्वसाधारण दराने काढली जात आहेत. त्यामुळे लाख, सव्वालाख रुपयांपर्यंत बिले आली आहेत. शेतकरी बागायतदारांचे शेतीपंप रद्द करून ते बागायतीतील पंप जोडणी म्हणून सर्वसाधारण दराने बिले आकारली जात आहेत. गेली तीन वर्षे बिले माफ केली, आता दंडात्मक दराने मागील बिलांची वसुली केली जात आहे का? असा सवाल व्यक्त होत आहे. भाजीपाला, बागायती, नर्सरीला आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विधानसभेत यावर आमदार शेखर निकम यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी विजजोडणी तोडणे बंद करावे, असे निश्चित झाले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कोकणात झालेली नाही. वातावरणातील बदलांमुळे होणार्या विपरित परिणामांमधून शेतकरी बाहेर पडत आहे. त्यात महावितरणकडून त्रास दिला जात आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.