
रत्नागिरी शहरातील अनधिकृत खोके हटणार ?
रत्नागिरी ः रत्नागिरी शहर टपर्यामुक्त करण्यांत निर्णय रत्नागिरी पालिकेने केला आहे. फुटपाथवर रस्त्याच्या बाजूला बसणार्या खोके, हातगाड्या तात्काळ हटवा असे आदेश पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. कारवाई दरम्याने कोणत्याही नगरसेवकाने अथवा नगरसेविकेच्या पतीने हस्तक्षेप केल्यास त्यांची नाहवे जाहीर करा. मात्र कारवाई करताना कामचुकारपणा केल्यास रनपच्या अधिकार्यांवर कारवाई करा असाही निर्णय घेण्यात आला. याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला आहे. सेना नगरसेविका सौ. श्रद्धा हळदणकर यांनी लेखी पत्राद्वारे खोका हटविण्याची मागणी केल्यानंतर हा विषय चर्चेला आला होता.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत शहरातील अतिक्रमण हटावचा मुद्दा गाजला. सेनेच्या नगरसेविका सौ. हळदणकर यांनी नाट्यगृहाशेजारी असलेल्या शहाळे पाणी विक्रेत्यावर कारवाई करण्याचे पत्र सभागृहात दिले. या पत्राचा मुद्दा पकडून राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी सभागृहात शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. शहरात नागरिकांना अडथळा होईल अशा अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. मागील वेळी प्रशासनाने कारवाई केली परंतु काही नगरसेवक आणि इतरांनी हस्तक्षेप केला. यामुळे ही कारवाई थंडावली असा आरोप सुदेश मयेकर यांनी केला. यावेळी बंड्या साळवी यांनी कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप नव्हता. कोणी हस्तक्षेप केला असेल तर त्याची नावे जाहीर करा, अशी सूचना श्री. बंड्या साळवी यांनी केल्या. यावर सुदेश मयेकर यांनी अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासन कधीपासून सुरू करणार असा सवाल केला. यावर मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी संपूर्ण शहरात एकाचवेळी कारवाई करण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे सांगितले.