
दोन रुपयांत लिटरभर शुद्ध पाणी! पाचलमध्ये ग्रामपंचायतीने सुरू केले पाण्याचे मशीन
तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीतर्फे लोकांना कमी पैशामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पिण्याच्या पाण्याचे मशीन सुरू केले आहे. यामधून लोकांना दोन रुपयात साधे शुद्ध, तर पाच रुपयात थंड एक लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. पाचल ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. पिण्याच्या पाण्याचे मशीन सुरू करणारी पाचल ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यातील बहुधा पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
पाचल ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये सुरू केलेल्या या मशिनचा शुभारंभ सरपंच अपेक्षा मासये यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्याच्या पूर्व भागाचे केंद्र असलेल्या पाचल येथे परिसरातील मोठी बाजारपेठ असून बँकिंग, वैद्यकीय आणि शैक्षणिक आदी विविध सुविधाही या ठिकाणी आहे. त्यामुळे लोकांची नियमित वर्दळ असते. विविध कामानिमित्ताने येणार्या लोकांसह शाळकरी मुले मोठ्या संख्येने दिवसभरामध्ये या ठिकाणी येतात. त्यामधील अनेकांना एक लिटर पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे 10 ते 20 रुपयांचा भुर्दंड पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाचल ग्रामपंचायतीने सरपंच सौ. मासये, उपसरपंच नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मशिन सुरू केले आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
