रत्नागिरीकर पुन्हा अनुभवणार ‘तिमिरातूनी तेजाकडे’ जाणारा प्रवास
रत्नागिरी : रत्नागिरीतील नावाजलेली सामाजिक संस्था “जाणीव फाऊंडेशन”ने अल्पावधीतच अत्यावश्यक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. संस्था आता दशकपुर्तीकडे वाटचाल करीत आहे. या वेळी जाणीव आपणासाठी घेवून येत आहे, रत्नागिरीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला “तिमीरातूनी तेजाकडे” हा श्रवणीय कार्यक्रम. असाच कार्यक्रम सुमारे सहा वर्षांपूर्वी रत्नागिरीतील रसिकांनी अनुभवला होता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव निवासी अंधशाळा स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाचे विद्यार्थी सादर करतात. स्नेहज्योतीचे नाव आज महाराष्ट्रभर पोचले आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता, आयुष्याच्या सायंकाळी जेव्हा लोक निवांत आयुष्य जगत असतात, तेव्हा अध्यक्षा आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन भगिनींनी वेगळी वाट निवडून अंध मुलांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव अशा अंध शाळेची स्थापना केली. प्रतिकूल परिस्थितीत अनेक समस्यांवर मात करत या दोन देवदूतरुपी भगिनी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या त्यांच्या सहका-यांनी एक छोटेसे रोप लावले याचे आज वटवृक्षांत रुपांतर झाले आहे़. भारतरत्न सचिन तेंडूलकर याच्यासह सलील कुलकर्णी, संदिप खरे व अनेक मान्यवरांनी स्वत: भेट देऊन गौरविलेली ही संस्था आणि त्या वटवृक्षावरील किलबिलणारी ती अंध मुले या सर्वांनी आज संपूर्ण महाराष्ट्रावर संगीतमय गारुड केले आहे़.
संस्थेचे उत्तम जैन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्यासारखा निस्वार्थी आणि सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तीमत्वांनी आज स्नेहज्योतीची वाटचाल आणखी बळकट केली आहे. या शाळेतील मुलांच्या भाळी नियतीने अंधार लिहिला असला तरी त्या तिमिरावर मात करत त्यांच्या गायन, वादन कौशल्याने ते आपणांस तेजाकडे घेवून जातात आणि दोन तासांच्या जादूई संगीत मैफिलीनंतर येणारा प्रत्येक प्रेक्षक अतिशय तृप्त मनाने बाहेर येतो.
या वेळी या श्रवणीय प्रवासादरम्यान प्रसिद्ध गायिका बालश्री पुरस्कारप्राप्त मनश्री सोमण यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमाची घोषणा होताच रत्नागिरीतील आणि जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहूनही रसिकांनी आणि सामाजिक जाणीव असणाऱ्या लोकांनी प्रवेशिका खरेदी करुन तसेच कार्यक्रमाला विविधरुपी मदत करण्याची तयारी दाखवून चांगला प्रतिसाद दिला आहे. तरी हे भगिरथ कार्य पूर्णत्वास जावे म्हणून जाणीवला आपल्या आशिर्वाद आणि सहकार्याची गरज आहेच.
हा कार्यक्रम मंगळवार दि. 26 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7.00 वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी (वातानुकुलीत) येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सिद्धाई फुड्स- आरोग्य मंदिर, हॉटेल वैशाली- बाजारपेठ, श्रावणी ग्राफिक्स- आरोग्य मंदिर, हॉटेल व्हेज ट्रीट- कॉंग्रेस भवन आदी ठिकाणी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमातून उपलब्ध होणारा निधी हा स्नेहज्योती अंधविद्यालयास देणगी स्वरूपात देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे [9422003128] यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.