
बावनदी पात्रातून घरी जाण्याचा शॉर्टकट बेतला जीवावर; परचुरी येथे बुडून प्रौढाचा मृत्यू
संगमेश्वर : तालुक्यातील परचुरी बावनदी पात्रात शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एकजण बुडाल्याची घटना घडली होती. बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला आहे. शिवाजी पांडुरंग लिंगायत (वय 52, परचुरी) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शिवाजी लिंगायत हे सोनगिरी येथे नातेवाईकांकडे गेले होते. तेथून ते आपल्या घरी परतत असताना बावनदीला ओहोटी असल्याने त्यांनी नदीतून जाण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या जीवावर बेतला.नदीतून घरी जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. लिंगायत हे कोळंबे मार्गे ब्रीजवरून परचुरीमध्ये गेले असते तर कदाचित जीव वाचला असता. शॉर्टकट मारण्यात त्यांंना आपला जीव गमावावा लागला.
बुडाल्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर मुरुडकर, सचिन कामेरकर, हेड कॉन्स्टेबल मसुरकर, कोंदल यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पूर्ण माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी शोध कार्याला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही शिवाजी यांचा थांगपत्ता न लागल्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात झाली. यावेळी शिवाजी यांचा मृतदेह कोळंबे येथील पुलाच्या वरच्या बाजूला सापडून आला. ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह नदी किनार्यावर आणण्यात आला.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. त्यानंतर हा मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आला. दरवर्षी होणार्या पुरामुळे बावनदी पाण्याच्या प्रवाहात बदल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी शॉर्टकटचा अवलंब करून नदीतून न जाता कोळंबे ब्रीज, वांद्री-उक्षी ब्रीज यांचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.