जोतिबाच्या नावानं चांगभलं! रत्नागिरीतील पेठकिल्ला येथे घुमला गजर

जोतिबाच्या नावानं चांगभलं…च्या जयघोषात रत्नागिरीसह परजिल्ह्यातील भाविकांनी शहरातील पेठकिल्ला येथील पुरातन श्री जोतिबा मंदिरात दर्शनासाठी शनिवारी दि. 16 एप्रिल रोजी सकाळपासून मोठी गर्दी  केली होती.
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पेठकिला येथे श्री जोतिबा आणि विठलाई देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात आणि खेट्याचा काळात तसेच चैत्री पौर्णिमेला भाविकांची दर्शनाला मोठी  गर्दी असते. शनिवारी दि. 16 रोजी चैत्री पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी, चिपळूण, लांजा, संगमेश्वर, कोल्हापूर, सातारा, पुणे, कराड, सांगली आदी भागातील भाविकांनी दर्शनासाठी श्री जोतिबा मंदिरात गर्दी केली होती. भाविकांनी सकाळपासून जोतिबाची पूजा-अर्चा करून जोतिबाच्या नावानं चांगभलं…चा जयघोष केला. मंदिरात आलेल्या अनेक भाविकांनी केलेला नवस फेडला, अनेकजण नवस बोलले. जोतिबाच्या चरणी येऊन आपल्या मनातील इच्छा बोलल्यास ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
जोतिबा सेवा मंडळाचे पुजारी बबनराव सुर्वे यांनी सर्वांना सुखसमृद्धी मिळो, ऐश्वर्य मिळो आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे, अशी प्रार्थना जोतिबाच्या चरणी करून देवाला गार्‍हाणे घातले.
श्री जोतिबा सेवा मंडळातर्फे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी चोख व्यवस्था केली होती. तसेच प्रसादाचीही सोय केली होती. सकाळच्या वेळी भाविकांनी साबुदाणा खिचडी आणि चहा देण्यात आला. दरम्यान, सायंकाळी गोंधळ घालण्याचा धार्मिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री जोतिबा सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी,  मंदिराचे पुजारी बबनराव सुर्वे आणि अन्य मान्यवरांनी उत्सवासाठी मोलाची कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button